नागरिकांची गैरसोय त्वरित थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन! ‘आप’चा इशारा!
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे निलख गावातून पुणे स्टेशन, हडपसर आणि स्वारगेटसारख्या प्रमुख ठिकाणी जोडणारे महत्त्वाचे पीएमपी (PMPML) बस मार्ग काही कारणास्तव अचानक बंद करण्यात आले आहेत. पिंपळे निलखसाठी जीवनवाहिनी ठरलेले बस क्र. १०० (पुणे स्टेशन), बस क्र. ३३३ (हडपसर) आणि बस क्र. २१ (स्वारगेट) हे मार्ग बंद झाल्यामुळे परिसरातील नागरिकांसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे.
या अत्यावश्यक बस सेवा बंद पडल्याचा थेट परिणाम विद्यार्थी, नोकरदार आणि सामान्य नागरिक यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. बस बंद असल्यामुळे या लोकांना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जाण्यासाठी अधिकचा वेळ आणि अधिकचा पैसा खर्च करावा लागत आहे. नाइलाजाने महागड्या खासगी वाहतूक साधनांचा वापर करावा लागत असल्याने नागरिकांवर मोठा आर्थिक ताण पडत आहे, तसेच वेळेवर कामावर किंवा शिक्षणस्थळी पोहोचण्यात अडचणी येत आहेत, ज्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता, आम आदमी पार्टी (आप), पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष रविराज काळे यांनी प्रशासनाकडे तातडीची मागणी केली आहे की, नागरिकांची ही गैरसोय त्वरित दूर करावी आणि बस क्र. १००, ३३३ आणि २१ या मार्गांवरील बससेवा तातडीने व विनाविलंब पूर्ववत सुरू करावी.
जर पीएमपी प्रशासाने या मागणीची त्वरित दखल घेऊन बंद पडलेली बससेवा पूर्ववत सुरू केली नाही, तर आम आदमी पार्टी नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडण्यास मागेपुढे पाहणार नाही. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा स्पष्ट इशारा ‘आप’ ने दिला आहे.


