शबनम न्यूज | प्रतिनिधी
भारतीय आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसारासाठी, तसेच रशियामध्ये आयुर्वेदाचे अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी पुण्यातील प्राचीन संहिता गुरुकुल व रशियातील ट्रिनिटी व्हिलेज सेंटर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. प्राचीन संहिता गुरुकुलाचे संस्थापक डॉ. हरीश पाटणकर व ट्रिनिटी व्हिलेजचे प्रमुख मिरोशनीचेन्को अलेक्से अर्काडेव्हीच यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
डॉ. हरीश पाटणकर म्हणाले, “या सामंजस्य करारामुळे भारतीय वैद्यांना रशियामध्ये येण्यासाठी मदत होईल. येथे योग, आयुर्वेदाची प्रॅक्टिस व अभ्यासक्रम, प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. याअंतर्गत रशियामध्ये
प्राचीन संहिता गुरूकुल सुरु होणार असून, विविध अभ्यासक्रम चालवता येणार आहेत. आयुर्वेदातील विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी ‘फॅकल्टी एक्स्चेंज’ उपक्रमांत रशियात सोय करता येईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत आयुष व भारतातील काही नामवंत संस्था, रशियातील ब्रिक्स युनिव्हर्सिटी, रुडान युनिव्हर्सिटीसोबत सेमिनार घेता येतील. रशियन लोकांना हवा असलेला भारतातील आयुर्वेद त्यांच्यापर्यंत पोहचविणे आता सोपे होणार आहे. रशिया व भारत यांची अनेक दशकांची मैत्री आणखी दृढ होण्यास मदत होईल.”
“गेल्यावर्षी आयुर्वेद दिनानिमित्त रशियातील भारतीय दूतावास आणि ब्रिक्स युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित कार्यक्रमात भारतातील आयुर्वेद राजदूत म्हणून यायची संधी मिळाली. तयामध्ये आपले विचार येथील लोकांपर्यंत पोहचवता आले. यावर्षी हा सामंजस्य करार झाला, याचा आनंद वाटत आहे. गेल्या १६-१७ वर्षांपासून रशियात करत असलेल्या कामाचे हे फलित आहे. सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज, निरंजन दास, वैद्य समीर जमदग्नी यांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांची कृपा यामुळे हे शक्य झाले. या कामात बंधू पंकज पाटणकर, पत्नी डॉ. स्नेहल पाटणकर व कन्या स्मृती आणि संहिता यांची मोलाची साथ लाभली आहे,” अशी भावना डॉ. पाटणकर यांनी व्यक्त केली.








