spot_img
spot_img
spot_img

सेवा हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे राज्य आयुक्त दिलीप शिंदे यांचे आवाहन

शबनम न्यूज | पुणे
२८ एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलबजावणीस १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या औचित्याने अधिनियमाच्या जनजागृतीसाठी २८ एप्रिल हा दिवस जिल्हा व ग्रामस्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन सेवा हक्क दिन साजरा करावा, असे आवाहन राज्याचे सेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी केले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयोगाच्या उप सचिव अनुराधा खानविलकर, अपर आयुक्त अरुण आनंदकर, उपायुक्त विजय मुळीक, नितीन माने, दत्तात्रय लांघी, तसेच पुणे विभागातील सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली व पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
आयुक्त  शिंदे म्हणाले, राज्यातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक गतीमान व कालबध्द पध्दतीने देण्याकरिता २८ एप्रिल २०१५ रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंमलात आला आहे. या अधिनियमांतर्गत ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून त्यापैकी ५३६ सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. अधिनियमाचा प्रभावी वापर झाल्यास नागरिकांचे जीवन सुकर करण्यास मदत होईल. अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी घरपोच सेवा देणारा सेवादूत उपक्रम, ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत शासनाच्या सर्व विभागांच्या अधिसूचित सेवा उपलब्ध करुन देणे, सर्व शासकीय कार्यालयांत व आपले सरकार केंद्रांवर सेवा शुल्क व कालमर्यादा यांची माहिती देणारे व तक्रार नोंदविणेसाठी क्यू आर कोड उपलब्ध करुन देणे, आपले सरकार सेवा केंद्र सुरु करणे, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करणे आदी उपक्रम जिल्हाधकारी यांनी त्यांचे जिल्ह्यांमध्ये राबवावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्यात आलेल्या सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचना देऊन सर्व सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवणे म्हणजेच खऱ्या अर्थाने नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!