शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुतण्या आणि जावई यांच्यात सुरू असलेल्या वादात मध्यस्थी केल्याच्या रागातून चुलत्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी बुधवारी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी दत्तात्रय ज्ञानेश्वर कुटे (वय ४५, रा.भोसे, खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तेजस गणेश कुटे (वय २३, रा. भोसे, खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना बुधवारी (दि.५) सायंकाळी पठारे वस्ती, भोसे येथे घडली. फिर्यादी घरगुती सामान घेण्यासाठी जात असताना पठारे वस्ती येथे त्यांचा पुतण्या तेजस आणि जावई स्वप्नील गायकवाड यांचे बंधू सागर गायकवाड यांचा पाणीपुरी ठेला लावण्याच्या कारणावरून वाद सुरू होता. फिर्यादी त्यांचा वाद मिटवण्यासाठी गेले आणि आरोपीला भांडणे करू नको असे सांगितले. याच्या रागातून फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.








