तुषार हिंगे यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा हद्दीतील असलेल्या वाय.सी.एम. हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या जागेवर जे. जे. रुग्णालय मुंबईच्या धर्तीवर अद्ययावत व सुसज्ज असे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड मनपाचे माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नुकतेच मुंबई मंत्रालय येथे तुषार हिंगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले आहे. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पुढील कारवाईचे आदेश देखील संबंधितांना दिले आहे.
तुषार हिंगे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि त्याचा सध्याचा शासकीय आरोग्य यंत्रणेवर ताण लक्षात घेऊन, मुंबईच्या जे.जे. रुग्णालयाच्या धर्तीवर अध्यायावत व सुसज्ज असे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या शहरातील वायसीएम रुग्णालयाच्या बाजूला असणाऱ्या जागेत उभारावे, तसेच महानगरपालिकेचे वायसीएम रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय विस्तारीकरण, पॅरामेडिकल, महाविद्यालय वैद्यकीय विद्यार्थी ,हॉस्टेल आदींसाठी विकासाचा आमचा मानस असून त्यामुळे वायसीएम हॉस्पिटल साठी वाढीव सुविधा उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे.
वायसीएम हॉस्पिटल हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मालिकेचे हॉस्पिटल आहे. एन एम सी सर्टिफिकेशन च्या मानांकनानुसार वैद्यकीय महाविद्यालयाचा भूखंड हा दहा एकर असावा लागतो सध्या वायसीएम हॉस्पिटलचा भूखंड हा 8.5 एकरचा आहे तथापि त्यांच्या शेजारील 1.5 एकर मनपाची जागा आहे ती जागा आरक्षण बदलण्यासाठी झोन चेंज नगर विकास विभागाला पाठविले आहे. तरी सदर जागेत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.








