शबनम न्यूज | प्रतिनिधी
नेस्को गोरेगाव येथे सुरू असलेल्या इंडिया मेरीटाईम वीक मध्ये मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत २६० कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले.
महाराष्ट्र सागरी मंडळाचे हे करार इचइंडिया आणि नॉलेज मरीन या कंपन्यांसोबत करण्यात आले. या करारांमध्ये यामुळे हरित टगबोटीसाठी बॅटरी निर्मिती आणि जहाज बांधणी व दुरुस्ती, बंदर उभारणी या प्रकल्पांचा समावेश आहे.
यावेळी बंदरे मंत्री नितेश राणे यांनी ग्रीन जहाज बांधणी आणि बंदर उभारणीविषयी डेन्मार्क येथील कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत सविस्तर चर्चा केली. तसेच करंजा, दिघी बंदरांच्या विकासाविषयीही गुंतवणुकीस उत्सुक असलेल्या कंपन्यांसोबत चर्चा केली.
यावेळी बंदर विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी प्रदीप, मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन खारा यांच्यासह संबंधित अधिकारी व कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
इंडिया मेरीटाईम वीक २०२५ या कार्यक्रमातील “मेरिटाईम एक्सलन्स आचीव्हर्स-२०२५ एक्झीबेशन ॲवार्ड” या विशेष सत्रामध्ये महाराष्ट्र राज्याला “शोकेस डायव्हर्सिटी अँड इम्पॅक्ट” या कॅटेगिरीमध्ये पुरस्कार प्राप्त झाला.
ही गौरवपूर्ण कामगिरी महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असून, गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्र शासनाला “इंडिया मेरीटाईम वीक” मध्ये मिळालेला हा पहिला पुरस्कार आहे. राज्य शासनाने सागरी क्षेत्रात केलेले विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि प्रभावी सादरीकरण याची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात आली असल्याची माहिती यावेळी विभागामार्फत देण्यात आली.








