शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जवळ आल्याने निवडणूक विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग कामाला लागले आहे. डिसेंबर अखेरीस निवडणूक होण्याची शक्यता असल्याने निवडणुकीच्या कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळाची तयारी करण्यात येत आहे. निवडणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी सुमारे १५ हजार अधिकारी, कर्मचारी लागणार आहेत. यासाठी महापालिकेचे कर्मचारी, शिक्षक, राज्य सरकारचे अधिकारी कर्मचारी तसेच अस्थायी कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात येण्याची शक्यता आहे. निवडणूक केंद्र, विविध सेल यासाठी मनुष्यबळाची जुळवाजुळव करण्याची तयारी सामान्य प्रशासन विभागाने सुरू केली आहे.
सन २०१७ नंतर सुमारे नऊ वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. निवडणूक पारदर्शक वातावरणात तसेच सुरळीत पार पडावी यासाठी कर्मचाऱ्यांची मोठी फौज आवश्यक आहे. निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना तयार झाली आहे.
आता विधानसभा मतदारसंघानुसार मतदार याद्या फोडण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहे. त्यावर सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या विविध कामकाजासाठी वर्ग एक ते वर्ग चारच्या अधिकारी-कर्मचार्यांची आवश्यकता भासणार आहे. सद्यस्थितीत महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने ३०१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तर पुढे आणखी १५ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणार आहे.
निवडणुकीसाठी २१०० मतदान केंद्र असणार आहेत. या प्रत्येक केंद्रावर एक केंद्र प्रमुख आणि चार कर्मचारी असतील. तसेच सुरक्षेसाठी देखील एक वर्ग चारचा कर्मचारी असेल. म्हणजेच निवडणूक केंद्रावरच १२ हजार ६०० कर्मचारी असतील. याशिवाय २० टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार, सुमारे १५ हजार अधिकारी व कर्मचार्यांची फळी निवडणुकीसाठी कष्ट घेणार आहे.








