spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेविकेच्या घरावर दरोडा

माजी नगरसेविकेच्या घरावर दरोडा टाकणारे गुन्हेगार अद्यापही फरार कसे ?

– पोलिसांवर राजकीय दबाव आणल्यामुळेच दरोडेखोर मोकाट असल्याची चर्चा

– पोलिस तक्रारीची दखल घेत नसल्याचा माजी नगरसेविका जयश्री गावडे यांचा आरोप

पिंपरी, दि. २९ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेविका जयश्री गावडे यांच्या गावडे पार्क येथील बंगल्यावर रविवारी (दि. २६) सकाळी सातच्या सुमारास दहा ते अकरा जणांनी दरोडा टाकला. घरातील कामगाराला बेदम मारहाण करत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १ कोटी १३ लाख रुपयांचा ऐवज पसार केल्याचा आरोप गावडे यांनी केला आहे. या दरोड्यात निगडी प्राधिकरणातील एका राजकीय पदाधिकारी महिलेचा सहभाग असताना पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. यावरुन पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरोड्याचा प्रकार घडून चार दिवस उलटले तरी सर्व दरोडेखोर फरार असून त्यांना बेड्या ठोकण्यास पोलीस का घाबरत आहेत ?, पोलिसांच्या अशा बेगडी भूमिकेमुळे खाकी वर्दिवरील सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास डळमळीत झाल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.

माजी नगरसेविका जयश्री गावडे यांच्या बंगल्यावरील दरोड्याचा प्रकार रविवारी (दि. २६) सकाळी सात वाजता चिंचवड येथील गावडे पार्क येथे घडला. यासंदर्भात गावडे यांच्या घरातील कामगार ज्ञानेश्वर सर्जेराव पवार (वय ३१, रा. सुरभी बंगला, गावडे पार्क, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अकरा जणांच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. परंतु, दरोड्याचा कट रचणा-या निगडी प्राधिकरणातील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी महिलेचे नाव पोलिसांकडून वगळण्यात आले. त्यासाठी या पदाधिकारी महिलेने वरीष्ठ पातळीवरील राजकीय व्यक्तीचा पोलिसांवर दबाव आणल्याची चर्चा संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात सुरु आहे. त्यामुळे निगडी प्राधिकरणातील ही राजकीय पदाधिकारी महिला कोण आहे, याबाबत पिंपरी-चिंचवड शहरात तर्क वितर्क लढविले जात आहेत. तिला पाठीशी घालण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणारा वरिष्ठ पातळीवरील नेता नेमका कोण, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे या पदाधिकारी महिलेने दरोडा टाकल्यानंतर श्रीनिवास कलाटे यांच्या गाडीतून घाईघाईने पळ काढला. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या महिलांना या गाडीने धडक दिली. यात महिला जखमी झाल्यामुळे त्या सर्व महिला राजकीय महिलेच्या विरोधात तक्रार देण्यासाठी चिंचवड पोलीस ठाण्यात गेल्या. परंतु, मागासवर्गीय समाजाच्या असल्यामुळेच पोलिसांनी या महिलांची तक्रार घेण्यास विरोध केला. राजकिय पदाधिकारी महिलेने पोलिसांवर दबाव आणल्यामुळेच पोलीस आमची तक्रार घेत नसल्याचा आरोप गाडीची धडक बसून जखमी झालेल्या महिलांनी केला आहे. त्या आता न्यायासाठी एससी आयोगात जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी नगरसेविका जयश्री गावडे आणि अमित गावडे यांचे कुटुंबिय एकाच बंगल्यात राहतात. मंगळवारी (दि. २२) जयश्री गावडे आपल्या परिवारासह बाहेर होत्या. रविवारी (दि. २६) सकाळी सात वाजता त्यांच्या घरातील कामगार ज्ञानेश्वर पवार यांना आशिष गावडे यांनी घरातील पाणी संपल्याचे फोन करुन सांगितले. त्यावर ज्ञानेश्वर हे दरवाजा उघडून मोटार चालू करण्यासाठी जात होते. तेवढ्यात समोरील आशिष गावडे, अमित गावडे यांनी त्यांना धक्का देऊन खाली पाडले. त्यानंतर गणेश सकाटे, योगेश गायकवाड, श्रीनिवास कलाटे यांनी ज्ञानेश्वर यांना बेदम मारहाण केली. दरम्यान, योगेश गायकवाड, अतुल गीरमे, चालक नामे काक्या तसेच दहा ते बारा बाऊन्सर घरात घुसले. घराच्या पहिल्या, दुस-या व तिस-या मजल्यावरील माजी नगरसेविका जयश्री गावडे यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य बाहेर फेकले. त्यावेळी आशिष गावडे व अमित गावडे यांच्या कुटुंबातील प्रियंका गावडे, मोनिका आशिष गावडे, मालन मोरेश्वर गावडे हे देखील घराच्या परिसरात आले. सर्व साहित्य घराबाहेर फेकल्यानंतर ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून धमकी देऊन गाड्यांच्या चाव्या घेतल्या. जयश्री गावडे यांच्या सर्व गाड्या बंगल्याबाहेर काढल्या. ज्ञानेश्वर यांना पुन्हा मारहाण करुन तेथून हाकलून लावले.
——

माजी नगरसेविकेचा तेजस्विनी कदम यांच्यावर आरोप

माजी नगरसेविका जयश्री गावडे दोन दिवसानंतर घरी परतल्या. त्यांनी घराची तपासणी केली असता दरोडेखोरांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने, देवघरातील देवाच्या महागड्या मूर्ती आणि रोख रक्कम मिळून एक कोटी १३ लाख रुपयांचा ऐवज लुटल्याचे निदर्शनास आले. दहा ते अकरा व्यक्तींच्या समवेत दरोडा टाकल्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी तेजस्विनी कदम हिने सीसीटीव्हीचा डिव्हीआर काढून पसार केल्याचा दावा देखील माजी नगरसेविका जयश्री गावडे यांनी तक्रारीत केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाशी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनूप मोरे यांचा कसलाही संबंध नसताना त्यांना यात गोवण्याचा प्रकार पोलिसांकडून केला जात आहे.

——

अनूप मोरे यांच्या बदनामीसाठी पोलिसांवर दबाव

दरम्यान अनूप मोरे हे केवळ घटनास्थळी उपस्थित होते. त्याठिकाणी पोलीस देखील होते. त्यांच्या समोर हा प्रकार घडलेला असताना मोरे यांच्या नावाचा तक्रारीत उल्लेख करुन त्यांची बदनामी करण्याचे षड़यंत्र राजकीय पदाधिकारी महिलेने पोलिसांच्या मदतीने रचल्याचे संपूर्ण प्रकरणावरुन दिसते आहे. दरम्यान पोलीस हे नेमके कोणाच्या दबावाला बळी पडून हे कारस्थान करत आहेत. या प्रकरणाशी माझा काडीमात्रही संबंध नाही, असे स्पष्टीकरण अनूप मोरे यांनी दिले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!