शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते. या शहरात अनेक विकास कामे झाली आहेत. शहरातील प्रत्येक प्रभाग हा विकसनशील प्रभाग म्हणून ओळखला जातो, परंतु याच स्मार्ट सिटी चा एक भाग दापोडी परिसर हा विकासापासून आजही वंचित आहे, अशी खंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पिंपरी विधानसभा समन्वयक सुषमा शेलार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली.
पिंपरी चिंचवड शहर हे विकासाच्या दृष्टिकोनातून नावलौकिक मिळवलेले शहर. परंतु या शहरात दापोडी हा परिसर अनेक वर्षापासून विकासापासून वंचित राहिला आहे. दापोडी परिसरात अशा अनेक आरक्षित जागा आहेत, ज्या विकसित होणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने या जागा अनेक वर्षापासून विकसित केल्या जात नाहीये. त्यामुळे दापोडी परिसरात शाळा, उद्याने, दवाखाने तसेच नागरिकांसाठी सुविधा देणाऱ्या अनेक प्रशासकीय सुविधा या मिळत नाहीये, दरवर्षी पावसामुळे दापोडी परिसरात पूर परिस्थिती निर्माण होते. अनेकांच्या घरात पाणी शिरून अनेक कुटुंबांना नुकसान सहन करावे लागते. या पावसाळ्याच्या काळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने या पूरग्रस्त नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले जाते, एखाद्या शाळेत थांबविले जाते, पण ही पूर परिस्थिती का निर्माण होते, या परिस्थितीवर कायमची उपाययोजना करावी, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. जर प्रशासनाने यावर काम केले तर अशी पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, असेही सुषमा शेलार यांनी सांगितले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे आरक्षित असलेल्या जागा या विकसित करावे, नागरिकांना सोयी सुविधा पुरविले जावे, यासाठी अनेक वेळा सुषमा शेलार यांनी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु प्रशासनाने त्यांच्या पत्रव्यवहारची कोणतीही दखल घेतली नसल्याचे सुषमा शेलार यांनी सांगितले. तसेच दापोडी परिसरातील या आरक्षित जागा लवकरात लवकर विकसित केल्या नाही तर आपण आमरण उपोषण करू, असाही इशारा प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सुषमा शेलार यांनी दिला आहे.
पिंपरी चिंचवड शहर हे जसे स्मार्ट सिटी शहर म्हणून ओळखले जाते तशीच ओळख दापोडीचीही व्हावी व दापोडी परिसरात मोठ्या प्रमाणात विकास होणे बाकी आहे, ते लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी सुषमा शेलार यांनी केली आहे.








