शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत असून, चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांसाठी पसंतीचे क्रमांक हवे असतील, त्यांनी दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत विहित नमुन्यातील अर्जासह कार्यालयाच्या खाजगी वाहन विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह अर्ज सादर करावेत. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास, त्यांची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावासाठीचे डीडी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. प्राप्त अर्जांसाठीचा लिलाव त्याच दिवशी दुपारी ४.०० वाजता सभागृहात पार पाडला जाईल.
दुचाकी वाहनांसाठी पसंती क्रमांकाकरिता, अर्ज २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत स्वीकारले जातील. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी नोटीसबोर्डवर प्रसिद्ध केली जाईल. लिलावाचे डीडी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील व त्याच दिवशी दुपारी ४.०० वाजता सहकार सभागृहात लिलाव प्रक्रिया पार पाडली जाईल.
सदर डीडी ‘R.T.O, Pune’ यांच्या नावे पुण्यातील नॅशनलाईज्ड/शेड्युल्ड बँकेचा असावा व तो दोन महिन्यांपेक्षा जुना नसावा. अर्जासोबत पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे बंधनकारक राहील. लिलावाकरिता एकच डीडी सीलबंद पाकिटात जमा करावा. चुकीच्या नावे अथवा कमी रकमेच्या डीडी स्वीकारले जाणार नाहीत. लिलाव प्रक्रियेदरम्यान एकाच अर्जदाराकडून एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त पाकिटे जमा झाल्यास असा अर्ज रद्द करण्यात येईल. जर एखाद्या क्रमांकाकरिता समान रकमेचे डीडी प्राप्त झाले, तर त्या क्रमांकासाठी चिठ्ठ्या टाकून निर्णय घेतला जाईल. अर्जदार उपस्थित नसल्यासही लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
वाहन मालकांना पसंती क्रमांक राखून ठेवण्याची सुविधा उपलब्ध असून, महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८१ च्या नियम ५४अ नुसार या क्रमांकाची वैधता १८० दिवसांपर्यंत राहील. आता NIC पोर्टलमार्फत या प्रक्रियेत सुधारणा करण्यात आल्या असून, कालबाह्य झालेले क्रमांक देखील पोर्टलवर पाहता येतील. फक्त प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे कार्यक्षेत्रातील पत्ता असलेले वाहन धारकच अर्ज सादर करू शकतील. चुकीचा डीडी, कार्यक्षेत्राबाहेरील अर्जदार किंवा मोबाईल क्रमांक नोंद नसलेले अर्ज अमान्य ठरविण्यात येतील.
लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पसंती क्रमांक ऑनलाइन वितरणासाठी उपलब्ध करून दिले जातील. याकरिता नागरिकांनी https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर आधारशी संलग्नित मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करून शुल्क भरून क्रमांक आरक्षित करता येईल. असे आवाहन सहायक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे.








