शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील तरुणांच्या शिक्षणातील संघर्ष, स्वप्नं आणि वास्तवाचं भावविश्व उलगडणाऱ्या “M.P.S.C. Boys” या आगामी मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.
Black Horse Motion Pictures आणि Uday Entertainment यांच्या संयुक्त निर्मितीतील हा चित्रपट दिग्दर्शक अविनाश किसनराव कांबीकर यांचा नवा सिनेमॅटिक प्रयोग असून, शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या ध्यासात जगणाऱ्या तरुणाईच्या आयुष्याचा प्रवास या चित्रपटातून उलगडला जाणार आहे.
चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये पुण्याच्या शनिवारवाड्याच्या पार्श्वभूमीत अभ्यासात, चर्चेत आणि स्वप्नात गुंतलेले विद्यार्थी दिसतात. तर बाजूला विविध क्लासेस आणी ॲकडमीच्या जाहीरात असलेले बॅनर दिसत आहेत, नोटबुकच्या पानांसारखी पार्श्वभूमी आणि हस्ताक्षरात लिहिलेलं शीर्षक “M.P.S.C. Boys” विद्यार्थ्यांच्या जगाशी जवळीक निर्माण करत जिवंतपणा आणतं.
“महाराष्ट्राच्या पोरांची शिक्षणाची कथा — आता मोठ्या पडद्यावर…!” या टॅगलाइनने चित्रपटाचा भावनिक केंद्रबिंदू प्रभावीपणे अधोरेखित केला आहे.
दिग्दर्शक अविनाश कांबीकर म्हणाले, “या चित्रपटातून मी त्या प्रत्येक तरुणाचा संघर्ष आणि आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, जो शिक्षणाच्या मैदानात आपलं भविष्य घडवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतो. ‘M.P.S.C. Boys’ ही केवळ एक कथा नाही, तर महाराष्ट्रातील पोरांची प्रेरणादायी सफर आहे.”
अविनाश कांबीकर यांनी यापूर्वी दिग्दर्शित केलेल्या “सुलतान” या लघुपटाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून, त्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप पाडली होती. संवेदनशील आणि वास्तववादी दृष्टिकोन असलेले हे दिग्दर्शक आता “M.P.S.C. Boys” च्या माध्यमातून तरुणाईच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाला हात घालत आहेत.
लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असून, 2027 च्या दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विद्यार्थ्यांच्या संघर्षमय प्रवासाची वास्तववादी झलक आणि प्रेरणादायी आशय या दोहोंचं उत्तम मिश्रण या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल.








