शबनम न्यूज | प्रतिनिधी
बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होत आहे. या चक्रीवादळाला थायलंडने सुचवलेले मोंथा हे नाव देण्यात आले असून, या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढील ३८ तासांत पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे.
अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही समुद्रात सध्या हवामान प्रणाली सक्रिय आहेत. त्यापैकी बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. मोंथा असे नाव असलेले हे चक्रीवादळ वायव्येकडे सरकून मंगळवारी (२८ ऑक्टोबर) आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याचा अंदाज आहे.या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांना रेड अलर्ट, तर पूर्व विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढील ४८ तासांत पुण्यासह राज्यभरात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. पुणे, मुंबई, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर या जिल्ह्यांसाठी इशारा देण्यात आला आहे.








