शबनम न्यूज | प्रतिनिधी
नेरळ माथेरान मिनी ट्रेन मार्गावर पुन्हा रेल्वेची चाके धावणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शंकर पारटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रशासनाने घाटातील रुळांच्या देखभाल आणि दुरुस्तीची कामे वेगाने पूर्ण केली आहेत.
येत्या काही दिवसांत मध्य रेल्वेच्या सेफ्टी ऑफिसर यांच्या उपस्थितीत ट्रायल रन होणार असून, सर्व अहवाल समाधानकारक आल्यास १ नोव्हेंबर पासून रेल्वेसेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. माथेरानच्या पर्यटन अर्थव्यवस्थेसाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
पावसाळ्यानंतर रखडलेल्या दुरुस्तीमुळे अनेक पर्यटकांना निराशा सहन करावी लागली होती. या पार्श्वभूमीवर जनार्दन पारटे यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीना यांना निवेदन देऊन कामांमध्ये गती आणण्याची मागणी केली होती.
निवेदनात पारटे यांनी २१ किलोमीटर घाटातील मार्गाची देखभाल अद्याप अपूर्ण असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रेनच्या डब्यांची रचना बदलण्याची मागणी केली होती. सध्या ट्रेनमध्ये एक फर्स्ट क्लास (१५ सिटर), तीन सेकंड क्लास (३० सिटर) आणि दोन लगेज कोच मिळून
एकूण ११५ आसनांची सोय आहे. प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा विचार करता एक मालवाहतूक डबा कमी करून प्रवासी डबा वाढवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच सध्या दररोज फक्त दोनच ट्रेन धावत असल्याने गर्दी वाढते, म्हणून सकाळी तीन आणि संध्याकाळी एक अशा चार फेऱ्यांमध्ये ट्रेन चालविण्याची मागणी पारटे यांनी केली आहे. रेल्वे प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत घाटातील ट्रॅक दुरुस्ती पूर्ण केली आहे. अंतिम तपासणी आणि ट्रायल रननंतर मार्ग पुन्हा खुला होणार आहे.








