spot_img
spot_img
spot_img

खेळाडूंच्या जडणघडणीसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांसह उत्तम पायाभूत सुविधा देण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद फडणवीस

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत या दृष्टीने शासनाच्या क्रीडा विभागाअंतर्गत एक व्यापक धोरण आपण अंगिकारले आहे. खेळाडूंना आपल्या क्रीडा कौशल्यात अधिक पारंगत होता यावे यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक व इतर पायाभूत सुविधा आपण व्यापक प्रमाणात उपलब्ध करुन देत आहोत. मिशन ऑलम्पिकची तयारी क्रीडा विभागामार्फत सुरु करण्यात आली असून गत काही वर्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे राज्यातील खेळाडू आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत यशाला गवसणी घालताना दिसत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

नागपूर येथे धरमपेठ क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित ७५ व्या राज्य बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य बॉस्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष तथा विधानपरिषद सदस्य संदीप जोशी, आमदार विकास ठाकरे, अखिल भारतीय बास्केटबॉल संघटनेचे सचिव कुलविंदर गिल, राज्य बास्केट बॉल असोसिएशनचे सचिव गोविंद मुथुकुमार व मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्राला चालना मिळावी, खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर आपल्या क्रीडा कौशल्याला दाखविण्याची संधी मिळावी यादृष्टीने खेलो इंडिया हे व्यापक अभियान हाती घेतले. महाराष्ट्राने क्रीडा क्षेत्रात अलिकडच्या काही वर्षात जे सातत्यपूर्ण प्रयत्न केले त्या प्रयत्नांना आपल्या खेळाडूंनी खेलो इंडियामध्ये सार्थकी लावले. गत तीन वर्षात महाराष्ट्र हा खेलो इंडियातील विविध स्पर्धांमध्ये आघाडीवर राहीला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नागपूर येथे आपण अधिकाधिक ठिकाणी खेळाडूंसाठी क्रीडा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मानकापूर येथे अंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम असे भव्य क्रीडा संकुल साकारत आहोत. मोठ्या प्रमाणात स्पर्धांचेही आयोजन करीत आहोत. चांगल्या खेळाडूला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या उपलब्ध करुन देण्यावर आमचा भर असल्याचे ते म्हणाले.

गत आठ वर्ष बास्केटबॉलसाठी संघटनेतील राजकारणामुळे खेळाडूंना अनेक गोष्टींना मुकावे लागले. खेळातील राजकारणाला बाजूला सारून खेळाडूंसाठी आणि क्रीडा क्षेत्रासाठी आमदार संदीप जोशी यांनी महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. ते खेळाडूंसाठी अधिक तत्परतेने आपली जाबाबदारी पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

क्रीडा संघटनामधील आपसी हेव्यादाव्यांपेक्षा खिलाडूवृत्तीला सर्वोच्च स्थान असल्याचे ते म्हणाले. कोणताही खेळाडू या खिलाडूवृत्तीच्या बळावरच आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात अखिल भारतीय पातळीवरील यश संपादन केलेल्या अंडर १८ व अंडर १३ स्पर्धेतील अनुक्रमांक तिसरा क्रमांक व रनरअप ठरलेल्या खेळाडूंना रोख बक्षीसांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट राज्य बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष तथा विधानपरिषद सदस्य संदीप जोशी यांनी केले. आठ वर्षानंतर प्रथमच या स्पर्धा महाराष्ट्रात होत असल्याचे त्यांनी सांगितले. खेळाडूंना प्रेरणा मिळावी यादृष्टीने आपण महाराष्ट्रात विजेत्या टिममधील खेळाडूंना रोख बक्षीसे देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार विकास ठाकरे व अखिल भारतीय बॉस्केट बॉल संघटनेचे सचिव कुलविंदर गिल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!