शबनम न्यूज | प्रतिनिधी
नशेसाठी पन्नास रुपये न दिल्याने एका तरुणाला चाकूने मारून जखमी केले. उपचारादरम्यान त्या जखमी व्यक्तीचा २५ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. ही घटना दि. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील वाकी खुर्द परिसरात उघडकीस आली.
शुभम सखाराम पवार (वय २४, रा. सातकर स्थान, चंद्रमा गार्डन जवळ, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मोहम्मद नसीम मोहम्मद कलाम शाह (वय ४२, रा. वाकी खुर्द, ता. खेड, जि. पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील मोहम्मद कलाम कयुम शाह (वय ७३) यांनी दि. १९ ऑक्टोबर रोजी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद कलाम शाह व त्यांचा मुलगा मोहम्मद नसीम त्यांच्या टायर पंक्चरच्या दुकानात झोपले होते. पहाटे आरोपी शुभम पवार याने तिथे येऊन मोहम्मद नसीम शाह यांच्याकडे नशेसाठी पन्नास रुपये मागितले, नसीम याने पैसे देण्यास नकार दिला असता आरोपीने बोथट चाकूने नसीम शाह यांना गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान दि. २५ रोजी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी शुभम पवार याला अटक केली आहे.








