शबनम न्यूज | प्रतिनिधी
आस्मानी संकट डोळ्यांसमोर असताना कोणीतरी मदतीसाठी येईल आणि तो ईश्वरच असेल, असा विचार शेतकरी करीत असतो. त्यावेळी भोसरीसह पिंपरी-चिंचवडमधील असंख्य हात नेहमीच मदतीसाठी पुढे येतात. सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने हाती घेतलेला “एक हात गोधन”चा उपक्रमामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाला बळ मिळणार आहे, अशी भावना भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
हिंदूभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष तथा भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने मराठवाडा आणि सोलापूरसह अन्य जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांमधील गरजवंतांना पहिल्या टप्प्यात १०६ गायींचे दान करण्यात आले. त्यासाठी आयोजित केलेल्या गोपूजन सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष चव्हाण बोलत होते.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे, माजी महापौर हिरानानी घुले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत हरहरे, भाजपा सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी, उद्योग-व्यापार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, २०१८-१९ मध्ये कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात महापूर आला होता. त्यावेळी आम्ही ‘‘एक हात मदतीचा’’ असा उपक्रम हाती घेतला. त्याला लोकसहभागातून ८० पेक्षा जास्त गाड्यांमधून मदत रवाना केली. पिंपरी-चिंचवडमध्ये हजारो लोकांनी मदत केली. शहरातील ‘रेस्कू टीम’ सुद्धा त्याठिकाणी कार्यरत होती.
आमच्या शहरातील नागरीक भावनिक आहेत. चिपळून-सिंधुदूर्गमध्ये निसर्ग चक्रीवादळाच्या संकटातसुद्धा आम्ही मदत नव्हे, तर कर्तव्य-जबाबदारी म्हणून मदतकार्य केले. आता मराठवाडा आणि सोलापूरसह अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकट म्हणजे आपल्या बांधवांवरील संकट आहे, अशा भावनेतून आम्ही मदतकार्य हाती घेतले. पहिल्या टप्प्यात ५१ गाड्या मदत रवाना केली. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात गोधन मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला, असेही आमदार लांडगे म्हणाले.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ वढू-तुळापूर येथील शंभूसृष्टीच्या कामासाठी रविंद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला. तसेच, पिंपरी-चिंचवड न्यायालय संकुलाच्या इमारत उभारणीबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण यांनी सकारात्मक निर्णय घेतले, अशा आठवणींना उजाळा आमदार महेश लांडगे यांनी दिला.
राष्ट्रीयत्व व हिंदुत्त्वाचा वारसा पुढे न्यायाचा : चव्हाण
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वांत उंच शिल्प ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ उभारण्यात येत आहे. या शंभूसृष्टीमध्ये आयोजित केलेल्या ‘‘ऐतिहासिक मानवंदना’’ सोहळ्याची वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. या भव्य शिल्पाच्या राष्ट्रार्पण सोहळा अतिभव्य करणार आहोत. त्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आपण मदत करावी, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले. त्याला प्रतिसाद देताना ‘‘देशात राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व यांचा वारसा पुढे न्यायचा असेल, तर छत्रपतींच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या प्रत्येक वास्तूपुढे नतमस्तक व्हावे लागेल.’’ त्यामुळे मी निश्चितपणे सहभागी होईल, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिला.
‘‘कोणतेही पुण्य आणि संकट वाटून घेणे..’’ हा भोसरीकर किंवा पिंपरी-चिंचवडकरांचा गुणधर्म आहे. त्यामुळे राज्यात कुठेही नैसर्गिक आपत्ती आली की, हजारोंच्या संख्येने मदतीचे हात पुढे येतात. गोधन पूजन करुन आज १०६ गायी गरजवंत शेतकऱ्यांना मोफत देण्यात येत आहेत. मराठवाडा आणि सोलापूरसह अन्य जिल्ह्यात यापूर्वी ५० हून अधिक गाड्या जीवनावश्यक वस्तुंचे वाटप १०० हून अधिक गावांतील पूरग्रस्तांना वितरीत केले. या ‘‘एक हात मदतीचा’’ उपक्रमात योगदान देणाऱ्या प्रत्येक दानशूर व्यक्तींबाबत आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.








