शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता ( वर्ग ३) साठी भरती केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध होणार आहे. या पदांसाठी महापालिकेने यापूर्वीच जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, या जाहिरात पदासाठी काही नवीन सामाजिक व समांतर आरक्षण प्रवर्गांतील जागा उपलब्ध झाल्याने या पदांसाठी पालिकेने सुधारित जाहिरातीनुसार पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही भरती स्थायी पदांसाठी असून निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी महापालिकेच्या सेवेत सामील होता येणार आहे. महापालिकेने यापूर्वी देखील अभियंता पदांसाठी भरती प्रक्रिया केली होती. मात्र, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काहीवेळा ही प्रक्रिया रखडली होती. यावेळी ही भरती प्रक्रिया कोणत्याही आचारसंहितेच्या काळात अडकणार नाही, याची काळजी घेतली आहे.यासाठी इच्छूक उमेदवारांना येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी दिली.
राज्य शासन निर्णय दि. २७ फेब्रुवारी २०२४ नुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग (एसईबीसी) प्रवर्गासाठी १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे पदसंख्या वाढवून नव्याने सुधारित आरक्षण रचना जाहीर करण्यात आली आहे.सुधारित जाहिरातीत काही नवीन सामाजिक व समांतर आरक्षण प्रवर्गातील जागा उपलब्ध झाल्याने इच्छुक उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. इच्छुकांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.








