शबनम न्यूज | प्रतिनिधी
पसंतीच्या (चॉइस) वाहन क्रमांकाबाबतचे वाढते आकर्षण राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत ठरत आहे. जानेवारी २०२५ पासून १५ ऑक्टोबरपर्यंत पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाला पसंतीच्या क्रमांकाच्या माध्यमातून ३७ कोटी ३१ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.
दुचाकी, चारचाकीला आपला आवडता क्रमांक, जन्मतारीख, लग्नाची तारीख किंवा एखाद्या आनंदाच्या घटनेची तारीख असावी, याकडे वाहनचालकांचा कल वाढला आहे. पसंतीच्या नंबरसाठी मोठी स्पर्धा असते. राज्य सरकारने सन २०२४ मध्ये पसंतीच्या नंबरच्या शुल्कात दुपटीने वाढ केली.त्यानंतरही स्वतःच्या वाहनांना आवडता क्रमांक घेण्याची स्पर्धा कमी झाली नसून यामध्ये दिवसेंदिवस वाढच झाली आहे. चार चाकी वाहनांसाठी ०००१ नंबरसाठी सहा लाख रुपये शुल्क आकारले जाते, तर पूर्वी ते तीन लाख होते. दुचाकी वाहनांसाठी शुल्क दुप्पट झाले आहे.
जानेवारी, मार्च आणि ऑगस्ट या महिन्यांत पसंतीच्या नंबरचा चार कोटींपेक्षा अधिक महसूल जमा झाला असून, सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाच कोटींवर महसूल जमा झाला आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मागील साडेनऊ महिन्यांत पसंतीच्या नंबरच्या विक्रीतून ३७ कोटी ३१ लाख ८२ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. ही कमाई मुख्यत: ०००१, ९९९९ सारख्या लोकप्रिय नंबरच्या बोलीमुळे झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.








