शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘लाडकी बहीण योजना’ साठी आता राज्यातील महिलांना ई केवायसी करणे गरजेचे करण्यात आले आहे. ही ई केवायसी करताना महिलांसह त्यांना ई केवायसी करून देणाऱ्यांची पार दमछाक होऊन जात आहे. काही दिवसांपूर्वी सातपुडा पर्वत चढून लाडकी बहीण ई केवायसीसाठी रेंज घेत असल्याचे फोटो समोर आले होते. तर कोणाला आधारचा ओटीपी आला तर वेबसाईट पुढे जात नाही, अनेकदा तर ओटीपीच येत नाही अशा अनेक समस्या येत होत्या.
लाडक्या बहिणीच्या ई केवायसीसाठी वेबसाईटवर खूप ट्रॅफिक असल्याचे मेसेज दाखविले जात होते. यामुळे अनेकींना दिवस-दिवस प्रयत्न करूनही ई केवायसी काही करता आलेली नाही. यासाठी मध्यरात्री २ ते पहाटे ४-५ वाजेपर्यंतची वेळ योग्य असल्याचे सांगितले जात होते. आता या लाडक्या बहिणी एवढ्या रात्री कुठे सातपुडा पर्वतावर रेंज घेण्यासाठी जाऊ शकतात, इतर भागातील महिला दिवसभर काम करून रात्री ई केवायसी करत बसणे थोडे कठीणच होते.
परंतू, दिवाळीचा हा काळ ई केवायसीसाठी खूप चांगला होता, असे समोर आले आहे. दिवाळीत सारेच सणासुदीत, फराळ बनविण्यात आणि तयारी करण्यात व्यस्त होते, यामुळे या काळात लगेचच ईकेवायसी होत होती. एका व्यक्तीने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर घरातल्या आणि पाहुण्या रावळ्यांच्या लाडक्या बहिणींच्या ई केवायसी करून टाकल्याचे सांगितले.
दिवाळीत महिला आणि पुरुष सारेच बिझी होते. कोणी प्रवासात होते, कोणी नातलगांकडे गेले होते. दिवाळीच्या या काळात सारेच फटाके फोडण्यात, फराळ खाण्यात व्यस्त होते. लक्ष्मीपुजन, धनत्रयोदशी, पाडव्याच्या पुजेत व्यस्त होते. लाडक्या बहिणी यानंतर भाऊबीजेच्या तयारीत होत्या. यामुळे सर्व्हरवरील लोड खूप कमी होता. आता देखील लाडक्या बहिणीच्या ई केवायसी करू शकता.








