पुणे शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ झाल्याने उष्णतेचा पारा पुन्हा ४१ अंशांच्या पुढे पोहोचला आहे. परिणामी, रविवारी (दि. ६) शहरात उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलाच वाढला होता. पाषाण येथे सर्वाधिक ४१.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून, पढाल दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
उत्तर दक्षिण वाऱ्याची द्रोणीय रेषा मराठवाड्यापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत जात आहे, तर एक वाऱ्याची द्रोणीय रेषा पूर्ण विदर्भापासून पूर्व बिहारपर्यंत जात आहे. त्यामुळे पुढील चार दिवस महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील, तर कमाल तापमानात दोन ते चार अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी, काही जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामान राहील. गुरुवारी विदर्भात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज आहे.राज्यातील हवामान बदलाचा परिणाम पुणे शहर आणि जिल्ह्यातही होणार असून, पुढील तीन दिवस कमाल तापमानात वाढ होणार असल्याने उन्हाचा चटका वाढणार आहे. त्यामुळे दिवसा हवामान कोरडेआणि आकाश निरभ्र राहील.. पुढील तीन दिवस दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.शहरातील पाषाण परिसर पाठोपाठ राजगुरुनगर येथे ४०.५, कोरेगाव पार्क ४०.२, तळेगाव ढमढेरे परिसरात ४०, शिरूर ३९.६, शिवाजीनगर ३९.२, चिंचवड ३८.९, हडपसर ३८.६, वडगाव शेरी ३८.४, मगरपट्टा ३८.२, एनडीए ३७.६, हवेली ३६.७अंश सेल्सिअस कमाल तपामानाची नोंद झाली.