शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी येथील माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक २१ मधील आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या निमित्ताने विशेष दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ नागरिक संस्था हॉल येथे करण्यात आले. समाजासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या २०० पेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करत त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.
कार्यक्रमामध्ये आरोग्य निरीक्षक धनेश्वर थोरवे, पी. व्ही. कांबळे, उमेश कांबळे, तसेच सामाजिक कार्यकर्ते शेखर अहिरराव, हनुमंत वाघेरे, संदीप वाघेरे, गोविंदा वाघेरे, राघवेंद्र भांडगे, शुभम वाघेरे, सचिन वाघेरे, किरण शिंदे, अर्जुन राठोड आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमात बोलताना संदीप वाघेरे म्हणाले, “आपण सर्वांनी गेल्या काही वर्षांत आरोग्य कर्मचाऱ्यांचं काम जवळून पाहिलं आहे. कोरोना काळात यांनी जीव धोक्यात घालून काम केलं. त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. दिवाळीचा सण आपण आनंदाने साजरा करतो, पण हे कर्मचारी त्या काळातही आपल्या कर्तव्यात रुजू असतात. त्यांच्या कष्टाचे आपण कायम ऋणी आहोत.”
कार्यक्रमामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ व भेटवस्तू देण्यात आले आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सौहार्दपूर्ण आणि आत्मीय वातावरणात पार पडले.