पिंपरी- विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘माय हार्ट इज बीटिंग…’ या व्हिज्युअल हिंदी – मराठी – इंग्रजी गीतांच्या सुरेल नि:शुल्क सांगीतिक मैफलीने श्रोत्यांच्या हृदयाची तार छेडली गेली. याप्रसंगी सचिन शेटे, उषा शेटे, विजय सांभारे, उत्तम जाधव, डॉ. किशोर वराडे, मल्लिकार्जुन इंगळे, विजय सहारे, राजेश शिंदे, सुभाष चव्हाण, विलास गादडे, नितीन यादव, प्रदीप गांधलीकर, अनिल घाडगे, शैलेंद्र पाटील, मुकेश शर्मा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात (छोटे सभागृह) रविवार, दिनांक ०६ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सांगीतिक मैफलीत विनायक कदम, नंदकुमार कांबळे, शुभांगी पवार, नेहा दंडवते, अनिल जंगम, सुधाकर बाविस्कर, डॉ. सायली बांबुरडे, विलास खरे, सुचिता शेटे – शर्मा, नीलेश मोरे, सुहासिनी कंझरकर, स्वाती पाटील, अरुण सरमाने, छाया अय्यर या गायक कलाकारांनी आपल्या एकल आणि युगुलस्वरातील सादरीकरणातून कृष्णधवल ते सप्तरंगी चित्रपटांतील तसेच चित्रपटसंगीतातील सुवर्णकाळाची स्वरानुभूती रसिकांना दिली. लोकप्रिय गीतांसोबतच सहसा जाहीर कार्यक्रमातून सादर न होणाऱ्या, विस्मरणात गेलेल्या अनवट गीतांचा समावेश हे या मैफलीचे खास वैशिष्ट्य ठरले. गणेशस्तवनानंतर नुकतेच दिवंगत झालेले ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांना ‘दिवानों को ये मत पुछो…’ या गीताने श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. ‘दिवाना मस्ताना…’ , ‘यही कही जियरा हमार…’ , ‘बाजीगर ओ बाजीगर…’ , ‘जाने कैसा हैं मेरा दिवाना…’ , ‘पायलीयाँ हो…’ , ‘धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना…’ , ‘इस प्यार से मेरी तरफ…’ या युगुलस्वरातील गीतांना श्रोत्यांची उत्तम दाद मिळाली; तर ‘अपलम् चपलम्…’ हे द्वंद्वगीत रसिकांना विशेष भावले. ‘सांज ढले गगन तले…’ चे गांभीर्य, ‘मिलती हैं जिंदगी में मोहब्बत…’ ची हुरहुर, ‘दिल दिवाना…’ तील विरह, ‘ये रेशमी जुल्फों का…’ मधील मादकता, ‘ये दिल और उनकी…’ ची नजाकत, ‘एप्रिलफूल बनाया…’चा खट्याळपणा आणि ‘मेरे सपनों की रानी…’ मधील प्रतीक्षा श्रोत्यांनी आपल्या उत्स्फूर्त टाळ्यांनी अधोरेखित केली. ‘शूर आम्ही सरदार…’ या मराठमोळ्या गीताने रसिक मनाला स्फुरण चढले. ‘माय हार्ट इज बीटिंग…’ या मैफलीच्या शीर्षकगीताचे अप्रतिम सादरीकरण रसिकांना खूप भावले; तर स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मूळ आवाजातील एकल गीतांचा गोडवा चपखल सादरीकरणातून श्रोत्यांपर्यंत पोहोचला.
विनायक कदम आणि नंदकुमार कांबळे यांनी संयोजन केले. सचिन शेटे यांनी विशेष साहाय्य केले. शैलेश घावटे यांनी ध्वनिसंयोजन केले. सौमिल घावटे यांनी दृकश्राव्यचित्रण केले. आकाश गाजुल यांनी छायाचित्रण केले. दृश्यनिर्मिती विक्रम क्रिएशनच्या साहाय्याने करण्यात आली. अरुण सरमाने आणि नंदकुमार कांबळे यांनी निवेदन केले.