spot_img
spot_img
spot_img

दिवाळीसाठी पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाची ‘सुरक्षित दिवाळी’ मोहीम

शबनम न्यूज | प्रतिनिधी

दिवाळीचा आनंद साजरा करताना, गेल्या काही वर्षांत शहरात दिवाळीच्या कालावधीत घडणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत ‘सुरक्षित दिवाळी’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आपत्कालीन परिस्थितीसाठी पूर्वतयारी तसेच विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी सुरक्षिततेच्या सूचनांचे काटेकोर पालन करून आनंददायी व सुरक्षित दिवाळी साजरी करावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

दिवाळीच्या काळात नागरिकांनी आपल्या परिसरातील पार्किंग, रस्ते, वसाहती आणि बाजारपेठांमध्ये निष्काळजीपणे फटाके फोडणे टाळावे. प्रत्येकाने स्वतःची, कुटुंबाची आणि समाजाची सुरक्षा राखावी. आग लागल्यास त्वरित १०१ या अग्निशमन नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अग्निशमन विभागाकडून करण्यात आले आहे.

अग्निशमन दल सज्ज
दिवाळी काळात शहरात आगीच्या घटनांची शक्यता लक्षात घेऊन अग्निशमन विभाग सज्ज झाला आहे. महापालिकेच्या सर्व १० अग्निशमन केंद्रांना सतर्क राहण्याचे, तसेच सर्व कर्मचारी आणि अधिकारी ‘रजा रद्द’ करून २४ तास कार्यरत राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्य नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार असून, १०१ क्रमांकावर संपर्क केल्यास तातडीने प्रतिसाद देण्यात येत आहे. फटाक्यांच्या स्टॉल परिसरात अग्निशमन वाहनांची गस्त ठेवण्यात आली आहे. फटाके विक्रेत्यांना आणि नागरिकांना लेखी व मौखिक सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी अशी घ्यावी काळजी

• गर्दीच्या भागात, इमारतीजवळ किंवा वाहनाजवळ फटाके फोडू नयेत.

• फटाका पेटल्यानंतर जर तो फुटला नाही, तर तो पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये.

• नायलॉन/सिंथेटिक कपड्यांऐवजी सूती कपडे परिधान करावेत.

• ज्वलनशील वस्तू, गॅस सिलिंडर, विद्युत तारा किंवा पेट्रोल/डिझेलजवळ फटाके फोडू नयेत.

• फटाके फोडताना किमान दोन मीटरचे अंतर राखावे.

• पेटलेले दिवे, फटाके किंवा अर्धवट फुटलेले फटाके हाताळताना खबरदारी घ्यावी.

• फटाक्यांचा साठा घरात, वाहनात किंवा बंद जागेत ठेवू नये.

• आग लागल्यास त्वरित १०१ वर संपर्क साधावा किंवा जवळच्या अग्निशमन केंद्राशी संपर्क करावा.

पिंपरी चिंचवड शहर जलद गतीने विकसित होत असून, नागरिकसंख्या आणि बांधकाम घनता वाढत आहे. त्यामुळे अग्निसुरक्षेचा विषय प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेला आहे. ‘सुरक्षित दिवाळी’ ही केवळ मोहीम नसून, नागरिकांमध्ये जबाबदार वर्तणुकीची सवय निर्माण करण्याचे पाऊल आहे. नागरिकांनी देखील या मोहिमेला सहकार्य करावे.
— प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

दिवाळीचा आनंद साजरा करताना सुरक्षिततेची जाणीव ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. निष्काळजीपणे फटाके फोडल्यामुळे अनेकदा आग लागून मालमत्तेचे नुकसान होते. दिवाळीचा सण आनंदाने साजरा करताना सुरक्षिततेची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे. नागरिकांनी अग्निशमन विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून आनंदाने दिवाळी साजरी करावी.
— उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

दिवाळी काळात अग्निशमन दलातील सर्व पथकांना अतिरिक्त सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक अग्निशमन केंद्रात आपत्कालीन वाहने आणि साधने तयार स्थितीत आहेत. याकाळात फटाक्यामुळे आग लागणार नाही, यासाठी नागरिकांनी फटाके उडवताना खबरदारी घ्यावी.
— ऋषिकांत चिपाडे, उप-अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!