spot_img
spot_img
spot_img

‘सूर्यदत्त’मध्ये ‘सूर्यभारत उद्योग संशोधन ज्ञानपीठ’ स्थापन

शबनम न्यूज | प्रतिनिधी
शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअप, संशोधन व इनोव्हेशनचे बीज रुजवण्यासाठी, तसेच त्यांना उद्योजक बनण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध होण्यासाठी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ‘सूर्यभारत उद्योग संशोधन ज्ञानपीठ’ स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी दिली.
दिवाळीच्या निमित्ताने ‘सूर्यदत्त’च्या वतीने आयोजित पत्रकारांशी संवाद कार्यक्रमावेळी प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया बोलत होते. पीवायसी हिंदू जिमखाना येथे झालेल्या कार्यक्रमावेळी ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा संजय चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, व्यवस्थापक (ऑपरेशन्स अँड रिलेशन्स) स्वप्नाली कोगजे, सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमच्या विभागप्रमुख रसिका गुमास्ते आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “शाळेपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत ज्ञानदान करणाऱ्या ‘सूर्यदत्त’मध्ये ‘मिशन: स्टार्टअप फॉर ऑल’ या ध्येयाने प्रेरित होऊन काम सुरु आहे. येणारा काळ उद्यमशीलतेवर आधारित असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअप, उद्यमशीलता, इनोव्हेशन संस्कृती रुजवायला हवी. अधिकाधिक उद्योजक निर्माण करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांची आवड, इच्छाशक्ती आणि तज्ज्ञता या गोष्टींवर आधारित उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. आंतरमहाविद्यालयीन, आंतरशाखीय आणि समविचारी विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना उद्योजक बनण्यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले जाणार आहे.”
या मोहिमेचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले जाईल. आरोग्य, स्वयंशिस्त आणि ध्येयासक्त शिक्षणावर भर देत त्यांच्या आवडी, करिअरच्या उद्दिष्टांशी सुसंगत उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढवला जाईल. निष्फळ किंवा दिशाभूल करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे वैयक्तिक परिवर्तन आणि स्वच्छ चारित्र्याची जडणघडण करण्याचा ‘सूर्यदत्त’चा प्रयत्न आहे. तसेच या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नवोन्मेष करण्यास, देशी उत्पादने व सेवा विकसित करण्यास प्रेरित केले जाईल, असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
‘सूर्यभारत उद्योग संशोधन ज्ञानपीठ’ची वैशिष्ट्ये:
– सर्वसमावेशक उद्योजकतेची शाळेपासून ते पदव्युत्तरपर्यंत सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना संधी
– विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक तज्ज्ञतेवर आधारित स्टार्टअप्ससाठी मार्गदर्शन
– संस्थेकडून मार्गदर्शन, पायाभूत सुविधा, मेन्टॉरिंग आणि अर्थसहाय्याची मदत
– ‘सूर्यदत्त’च्या माजी विद्यार्थ्यांचे मेंटॉरशिप, नेटवर्किंगसाठी सहकार्य
– पुढील टप्प्यात, उद्योजकतेत रस असलेल्या रहिवाशांना आणि व्यावसायिकांनाही सहभागाची संधी
‘सूर्यभारत’ हा उपक्रम आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे. भारतीय उत्पादने आणि सेवांना प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांमधून अधिकाधिक उद्योजक घडवण्याला गती मिळणार आहे. भारत सरकारचे मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत हे स्वप्न साकारण्यासाठी सूर्यदत्त संस्था नेहमीच पुढे राहिली आहे. आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये उद्योगाभिमुख मानसिकता तयार करण्यावर भर दिला आहे. ‘नोकरी मागणारे नको, नोकरी देणारे बनूया’ ही शिकवण ‘सूर्यदत्त’मध्ये दिली जाते. यासह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, निरोगी जीवनशैली आणि मूल्याधिष्ठित शिक्षण देऊन राष्ट्रनिर्मितीमध्ये योगदान देतील, असे सक्षम नागरिक आम्ही घडवतो.
– प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!