spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे मॉक ड्रिल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चऱ्होली उपअग्निशमन केंद्रामार्फत सांडपाणी शुद्धीकरण केंद्र (सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट) येथे गॅस लिकेज, स्वतःचा आणि इतरांचा बचाव, आग आणि आगीचे प्रकार तसेच आग विझविण्याच्या पद्धतींवर आधारित मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित कर्मचारी व नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत काय करावे आणि काय करू नये, याबाबत मार्गदर्शन केले.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांच्या अधिपत्याखाली उपअग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे आणि प्रभारी उपअग्निशमन अधिकारी विकास नाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मॉक ड्रिलमध्ये अग्निशमन विभागाचे जवान, सांडपाणी शुद्धीकरण केंद्राचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले होते.

गॅस लिकेज झाल्यास काय उपाययोजना कराव्यात, परिसर तात्काळ रिकामा करण्याचे महत्त्व, अग्निशमन साधनांचा वापर करून आग लागल्यास तात्काळ नियंत्रणात आणण्यासाठी काय करावे, तसेच स्वतःचा आणि इतरांचा जीवितहानीपासून बचाव कसा करावा, याबाबत सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. अग्निशमन दलातील जवानांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे गॅस लिकेज ओळखण्याची चिन्हे, लहान व मोठ्या आगींचे प्रकार आणि विविध अग्निशामक उपकरणांचा योग्य वापर कसा करावा, हे दाखवून दिले.

तसेच सांडपाणी शुद्धीकरण केंद्रामध्ये कोणीही व्यक्ती किंवा प्राणी पडल्यास, त्या ठिकाणी असलेल्या विषारी वायूंपासून स्वतःचे आणि केंद्रामध्ये अडकलेल्या व्यक्ती अथवा प्राण्याचे रक्षण करून प्राथमिक स्तरावर बचावकार्य कसे करावे, याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांडपाणी शुद्धीकरण केंद्रामधील बचावकार्य करताना पीपीई साधनांचा वापर, विषारी वायू ओळखण्यासाठी गॅस डिटेक्टर, हवेची गुणवत्ता तपासणी, सुरक्षित प्रवेश व निर्गमन तसेच आपत्कालीन तयारी याबाबत सविस्तर माहिती दिली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे प्राणरक्षण आणि सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अशा मॉक ड्रिलमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग अशा उपक्रमांद्वारे नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षा संस्कार रुजवण्याचे कार्य करत आहे.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

गॅस लिकेज किंवा आग यांसारख्या आपत्कालीन घटना क्षणात घडतात. अशा वेळी तत्काळ निर्णय घेणे आणि योग्य कृती करणे हाच जीव वाचवण्याचा मार्ग असतो. मॉक ड्रिलद्वारे नागरिक आणि संस्थांना प्रत्यक्ष सराव करून सज्ज ठेवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
– उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

औद्योगिक परिसरात गॅस लिकेज किंवा सांडपाणी शुद्धीकरण केंद्रातील आपत्कालीन घटना गंभीर परिणाम करू शकतात. त्यामुळे अशा ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला सुरक्षेचे मूलभूत प्रशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. या मॉक ड्रिलमुळे केंद्रामधील कर्मचार्‍यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
– विकास नाईक, उपअग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!