शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘पिंपरी येथील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान करीत असलेली माणूसधर्माची पेरणी हा धार्मिक सौहार्दाचा वस्तुपाठ आहे!’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे सोमवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी काढले. पाली – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान आयोजित जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना डाॅ. श्रीपाल सबनीस बोलत होते. माजी खासदार रामशेठ ठाकूर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, सहसचिव बंडू पवार, पद्मा दळवी आणि लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी माजी सनदी अधिकारी आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव; तसेच ज्येष्ठ लेखिका ललिता सबनीस यांना श्रीमती सखुबाई जगन्नाथ भारती आई सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले.
डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘सध्याच्या काळात जगात सर्वत्र अशांतता, द्वेष वाढीस लागला असून सांस्कृतिक मूल्यांच्या या र्हासपर्वात बाबा भारती प्रतिष्ठानचे जातपात अन् धर्मविरहित कार्य मानवता अधोरेखित करीत आहे. निष्कलंक चारित्र्याचे अधिकारी असलेल्या चंद्रकांत दळवी यांच्या व्यक्तिमत्त्वात गाडगेबाबांचे संतत्व आणि गांधीजींचा सेवाभाव उतरला आहे. माणदेश आता दळवी यांच्या नावाने ओळखला जातो. त्यांच्या निढळ गावाच्या विकासावर प्रसिद्ध झालेला ग्रंथ हा जणू ग्रामीण गीता आहे. अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांच्या नामावलीत त्यांनी स्थान प्राप्त केले आहे. अर्थातच सौ. पद्मा दळवी यांचे मोठे योगदान चंद्रकांत दळवी यांच्या कार्यामागे आहे!’ सत्काराला उत्तर देताना चंद्रकांत दळवी यांनी, ‘जीवनात संधी मिळणे महत्त्वाचे असते. सुमारे बेचाळीस वर्षांपासून निढळ या माझ्या गावाच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहिलो आहे. कर्मवीर भाऊराव पाटील आणि लोकशिक्षक बाबा भारती यांचे कार्य एकसमान आहे!’ अशी भावना आणि ललिता सबनीस यांनी, ‘पाली भाषेच्या संदर्भात खूप मोठे कार्य करणाऱ्या बाबा भारती यांना सखुबाई भारती यांनी मोलाची साथ दिली. आपल्या आईवडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महेंद्र भारती जी सेवा करीत आहेत, त्याचा थोडासा अंगीकार तरुण पिढीने केल्यास वृद्धाश्रम बंद होतील!’ अशी कृतज्ञता व्यक्त केली. रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘कर्मवीर अण्णांच्या शाळेतील ‘कमवा अन् शिका’ योजनेतून मी शिकलो. शिक्षक झालो आणि पुढे उद्योजक होऊन समाजकारणात आलो. राजकारणात कधीही कोणाशी शत्रुत्व पत्करले नाही!’ अशा शब्दांत आपला जीवनप्रवास कथन केला.
बाबा भारती आणि सखुबाई जगन्नाथ भारती यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी प्रास्ताविक केले; तर प्रा. डॉ. कामायनी सुर्वे यांनी मानपत्राचे वाचन केले. पुरुषोत्तम सदाफुले, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्राचार्य डॉ. एस. टी. साळुंखे, संजय मोहिते, अरुण गराडे, प्रभाकर वाघोले, रवींद्र भारती, निमिष भारती, प्रकाश कांबळे, विजय कांबळे, सचिन कांबळे यांनी संयोजनात सहकार्य केले. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. महेंद्र भारती यांनी आभार मानले.