वैद्यरत्न डॉ. चंद्रकुमार देशमुख यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार
शबनम न्यूज | प्रतिनिधी
गोव्यात नुकतीच “तीजोविधान – विद्धकर्म व अग्निकर्म कार्यशाळा व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक” हा आयुर्वेद क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रम पार पडला. या कार्यशाळेत वैद्यरत्न डॉ. चंद्रकुमार देशमुख यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन करत आयुर्वेदातील प्राचीन पण अत्यंत प्रभावी उपचारपद्धती – विद्धकर्म आणि अग्निकर्म – यांवर सखोल माहिती दिली. त्यांनी प्रत्यक्ष उपचारांचे प्रात्यक्षिक दाखवून उपचारपद्धतींची प्रभावीता सर्व सहभागी वैद्यांसमोर मांडली.
या कार्यक्रमात तब्बल १०० हून अधिक रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे ऑटिझम, नेत्रविकार, सांधेदुखी, पाठदुखी, संधिवात यांसारख्या आजारांवर उपचारांनंतर तात्काळ आणि स्पष्ट परिणाम दिसून आले. उपस्थित वैद्यांनी या उपचारांचा प्रत्यक्ष अनुभव घेत पारंपरिक आयुर्वेदिक उपचारपद्धतींच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची नवी ओळख निर्माण केली.
या भव्य कार्यशाळेला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भेट देऊन डॉ. चंद्रकुमार देशमुख यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचा विशेष सत्कार केला.
मुख्यमंत्री सावंत यांनी “आयुर्वेद म्हणजे भारताचा उपचारसूर्य असून आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रयोग हे आरोग्यसेवेच्या भविष्याचे केंद्रबिंदू ठरतील,” असे मत व्यक्त केले.
देशभरातून आलेल्या ५०० हून अधिक आयुर्वेद चिकित्सकांनी या कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन आयुर्वेद व्यासपीठ गोवा तर्फे करण्यात आले होते. यशस्वी आयोजनात डॉ. कृपा, डॉ. रश्मिना आमोंकर आणि डॉ. मल्हार जोशी यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.
“तीजोविधान” कार्यशाळेमुळे आयुर्वेद क्षेत्रात नवा उत्साह निर्माण झाला असून, या प्राचीन ज्ञानपरंपरेचा तेजोदीप पुन्हा एकदा विज्ञान, सेवा आणि उपचार यांच्या माध्यमातून प्रज्वलित झाला आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.