शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे : शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४५ दिवसांचा मोफत पायाभूत अभ्यासक्रम राबवण्यासाठी फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. हा अभ्यासक्रम १० एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असून, त्यात स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम), भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) या गटांतील मूलभूत संकल्पना शिकवल्या जाणार आहेत.फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय तडके, उपप्राचार्य डॉ. डी. डी. कुंभार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई), राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट), एमएचटी-सीईटी अशा परीक्षांची विद्यार्थी तयारी करतात. या विद्यार्थ्यांचे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या विषयांचे पायाभूत ज्ञान पक्के करून घेण्यासाठी पायाभूत अभ्यासक्रम राबवला जाणार आहे.
या अभ्यासक्रमात दहावीपर्यंतचे गणित, विज्ञान या विषयांची उजळणी करून घेतली जाणार आहे. तसेच, जेईई, नीट, एमएचटी-सीईटी या परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी पीसीएम, पीसीबी गटातील मूलभूत संकल्पना तज्ज्ञ, अनुभवी प्राध्यापकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत या अभ्यासक्रमाचा वर्ग होणार असल्याचे डॉ. कुंभार यांनी सांगितले.