शबनम न्यूज | प्रतिनिधी
”आम्ही क्रांतिवीर चापेकर बंधूच्या शौर्याच्या, प्रखर देशभक्ती व त्यागाच्या गोष्टी इतिहासात वाचत हाेताे, त्याचे प्रत्यक्ष दर्शन आज चलचित्राद्वारे आम्हाला घडले आहे. हुतात्मा चापेकर वाड्यामध्ये परंपरा, संस्कृतीच्या अनेक सुंदर छटा पहावयास मिळाल्या,चापेकर बंधूंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान, त्याग याची छाेटीशी झलक बघता आली. देशांतील तरूणांनी चिंचवडमध्ये येऊन चापेकरांच्या स्मृतींना अभिवादन करावे व त्यांच्याकडून देशभक्तीची प्रेरणा घ्यावी आणि भारत मातेच्या उत्कर्षासाठी कायम प्रयत्न करत रहावेत”, असे प्रतिपादन केरळ राज्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले.
चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयाला केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आज सदिच्छा भेट देऊन चापेकर स्मारकाची पाहणी केली. त्याचबरोबर हुबेहूब दिसणारी सुबक शिल्पे व चलचित्रपटाद्वारे हुतात्मा चापेकर बंधूचा इतिहास जाणून घेतला त्यावेळी प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे स्वागत केले तर चापेकर स्मारक समितीच्या वतीने देखील त्यांचा सन्मानचिन्ह, शाल देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी महानगरपालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कोषाध्यक्ष रवींद्र नामदे, मुकुंदराव कुलकर्णी, सदस्य डॉ शकुंतला बन्सल, सुहास पोफळे, अतुल आडे , मैथिली कुलकर्णी, सतिश अवचार नरेंद्र पेंडसे,हेमंतराव हरहरे,तसेच क्रांतिवीर चाफेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित हाेते.