शबनम न्यूज | प्रतिनिधी
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘झालमुडी’चा आस्वाद घेतल्याचा व्हिडीओ देशभरात प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे चर्चेत आलेले झालमुडी विक्रेते विक्रम साऊ यांना आता सुरक्षा पुरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम साऊ यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तान आणि बांगलादेशमधून फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार केली होती. या धमक्यांमुळे साऊ आणि त्यांचे कुटुंब प्रचंड दहशतीत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी त्यांच्या संरक्षणासाठी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.
पंतप्रधान मोदींना झालमुडी (बंगाली पद्धतीची भेळ) खाऊ घातल्यानंतर विक्रम साऊ यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर ते देशभरात चर्चेचा विषय ठरले. मात्र, याच प्रसिद्धीनंतर त्यांना धमकीचे फोन येण्यास सुरुवात झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, “याबाबत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुरक्षेच्या सर्व बाबींची तपासणी सुरू असून तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली जात आहे. सायबर गुन्हे तज्ज्ञांनाही तपासात सहभागी करण्यात आले असून धमकीचे फोन नेमके कुठून आले, याचा शोध घेतला जात आहे.”
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विक्रम साऊ यांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.


