spot_img
spot_img
spot_img

चिंचवडमध्ये चिंचेच्या झाडाखाली रंगला ‘तीन पत्ती’चा डाव; पाच जुगारींवर पोलिसांची कारवाई

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

चिंचवडमधील रामनगर परिसरात मोकळ्या जागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पिंपरी पोलिसांनी धाड टाकत पाच जणांवर कारवाई केली. चिंचेच्या झाडाखाली बसून ‘तीन पत्ती’ जुगार खेळणाऱ्या आरोपींकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई रविवारी (दि.१० मे) दुपारी साडेएक वाजण्याच्या सुमारास पाटील चाळ शेजारील मोकळ्या जागेत, रामनगर, चिंचवड येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई समीर लक्ष्मण ढवळे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीरपणे पैशांवर ‘तीन पत्ती’ जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता आरोपी जुगार खेळताना आढळून आले.

कारवाईत सतीश शांताराम चौगुले (वय ४२), मच्छिंद्र विठ्ठल पवार (वय ५४), लाला केरू शेलार (वय ४९), मोहन मुकुंद लष्करे (वय ६१) आणि दत्तात्रय गोविंद कांबळे (वय ५०) या पाच जणांविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपींकडून एकूण १ हजार ५१० रुपयांची रोख रक्कम तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे. काही आरोपींना बीएनएसएस कलम ३५(३) प्रमाणे नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

परिसरात उघड्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, अशा अवैध प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!